ॐस्मरणPrayer Library
← Back to Aarti
Aarti · Marathi

आरती सप्रेम

Aarti Saprem

Reading size 100%

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म । भक्तसंकटीं नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी । वेद नेले चोरूनि ब्रह्मा आणुनियां देसी ॥ मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसातळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी । परोपकारासाठीं देवा कांसव झालासी ॥ दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरूप होसी । प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवें अवतारीं बळीच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळी नेसी ॥ सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी । वामनरूप धरुनी बळीच्या द्वारीं तिष्ठसी ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥ निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला । सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला । तेहतीस कोटी देव बंदी हरिले सीतेला ॥ पितृवचनालागीं रामें वनवास केला । मिळवुनी वानरसेना राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें । नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ॥ गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचें प्रेम पाहुनी श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा । सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥ म्लेंच्छमर्दन करिसी म्हणोनि कलंकी केशवा । बहिरवी जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ ७ ॥

॥ शुभम् भवतु ॥
This page is part of the family prayer library.