मारुती स्तोत्र
Maruti Stotra
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ॥ १ ॥
महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळें । सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका ॥ २ ॥
दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा । पाताळ देवताहंता भव्य सिंदूरलेपना ॥ ३ ॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥ ४ ॥
ध्वजांगे उचली बाहो आवेशें लोटला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी देखतां कापती भयें ॥ ५ ॥
ब्रह्मांडे माईली नेणों आवळे दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥
पुच्छ ते मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरी । सुवर्णकटी कासोटी घंटा किंकिणी नागरा ॥ ७ ॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥
कोटीच्या कोटी उड्डाणें झेपावें उत्तरेकडे । मंदाद्रीसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती । मनासी टाकिलें मागें गतिसी तुळणा नसे ॥ १० ॥
अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें मेरुमंदार धाकुटे ॥ ११ ॥
ब्रह्मांडाभोवतें वेढें वज्रपुच्छें करू शके । तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळा ग्रासिलें सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥ १३ ॥
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी स्तोत्रपाठें करूनियां ॥ १४ ॥
भूतप्रेतसमंधादी रोगव्याधी समस्तही । नासती तुटती चिंता आनंदें भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी । दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें ॥ १६ ॥
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू । रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ॥ १७ ॥
॥ इति श्रीरामदासविरचितं संकटनिरसनं मारुतीस्तोत्रं संपूर्णम् ॥
This page is part of the family prayer library.